भैरवनाथ यात्रेतील लोककला निधीतून आणि युवानेते अजितदादा कोळेकर यांच्या सहकार्यातून नांदल जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वाटप
नांदल (विशेष प्रतिनिधी):येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त पारंपारिक कार्यक्रमांपेक्षा वेगळा पायंडा पाडत, ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून जमा झालेल्या लोकवर्गणीतून व युवानेते श्री. अजितदादा कोळेकर यांच्या विशेष सहकार्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदल येथील सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक ‘ट्रॅक सूट’चे (Track Suits) वाटप नुकतेच मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
नांदल गावात दरवर्षी भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त लोकनाट्य तमाशा, ऑर्केस्ट्रा व मराठी चित्रपटांचे आयोजन केले जात असे. परंतु, मागील ४-५ वर्षांपासून गावातील रितीरिवाज व परंपरा जपत नांदलची यात्रा कमिटी, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत गावातील सर्व अंगणवाड्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमासाठी यात्रा कमिटीकडून मिळणारा निधी आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांनी दिलेली देणगी (इनाम) यांचा वापर शाळेच्या भौतिक सोयी-सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केला जातो.
याच उपक्रमाचा भाग म्हणून एप्रिल २०२६ मधील भैरवनाथ यात्रेत जि. प. प्राथमिक शाळा, नांदल येथील चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद व निधी मिळाला होता. या निधीचा योग्य विनियोग करत आणि युवानेते श्री.अजितदादा कोळेकर यांच्या मोलाच्या सहकार्यातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खेळासाठी उपयुक्त असे ट्रॅक सूट भेट देण्यात आले.
या वाटप सोहळ्याच्या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मालन कोरडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विशाल रसाळ सर, शिक्षणप्रेमी सदस्य श्री. शिवाजी कोळेकर (काका), श्री. अजिंक्य कोळेकर, माजी अध्यक्ष श्री. सुनील कोळेकर, तसेच शिक्षकवृंद श्री. बांगर सर, श्री. धायगुडे सर, श्री. पिसाळ सर, सौ. कदम मॅडम, सौ. झावरे मॅडम, स्वयंसेविका सौ. प्रांजल रसाळ मॅडम यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेच्या निधीचा उपयोग मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता गावातील शैक्षणिक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केल्याबद्दल नांदल ग्रामपंचायत,यात्रा कमिटी व ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.








